ठाणे : घोडबंदर परिसरातील विविध भागांमध्ये सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून गॅस पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला. ऐन दुपारी स्वयंपाकाच्या वेळी गॅस बंद पडल्याने गृहिणींमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची भावना निर्माण झाली. अचानक गॅस बंद झाल्याने अनेक कुटुंबांना त्रास सहन करावा लागला.
महानगर गॅस कंपनीच्या माहितीनुसार, तांत्रिक देखभाल व दुरुस्ती कामासाठी दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गॅस पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचा संदेश काही ग्राहकांना पाठवण्यात आला होता, मात्र अनेकांना ही पूर्वसूचना मिळाली नव्हती, अशी तक्रार नागरिकांनी केली.
घोडबंदर परिसरात आनंद नगर, साईनगर, विजय पार्क, कासारवडवली आदी भागांतील हजारो कुटुंबांचा गॅस पुरवठा अचानक ठप्प झाला. पूर्व सूचना न मिळाल्याने अनेकांच्या घरी दुपारचे स्वयंपाकाचे नियोजन विस्कळीत झाले. अनेक गृहिणींना “स्वयंपाक करायचा कसा?” असा प्रश्न पडला. गोंधळलेल्या नागरिकांनी तातडीने महानगर गॅस कार्यालयाशी संपर्क साधला असता, तांत्रिक कामामुळे पुरवठा खंडित केल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी महानगर गॅस कंपनीने पुरवठा सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरळीत होणार असल्याचे आश्वासन दिले.