दिव्यातील शाळा परिसरात पोलीस गस्त वाढवावी



इंडिपेंडंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनची मुंब्रा पोलिसांकडे मागणी


दिवा \ आरती परब  : ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, Independent School Management Association, Thane (ISMA) तर्फे शाळा परिसरात पोलीस गस्त वाढवावी, नागरी सुरक्षा कडक करावी व आवश्यक तेथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी लेखी मागणी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली आहे.


संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात दिवा विभागातील अनेक शाळांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाळेत येताना व जाताना विद्यार्थ्यांना समाजकंटकांकडून त्रास दिला जात असल्याचा गंभीर उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण होऊन त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.


निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की काही दिवसांपूर्वी एका शाळेसमोर एका विद्यार्थ्याची अमानुष हत्या झाल्याची गंभीर घटना घडली असून, त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शाळा प्रशासनात असुरक्षिततेची भावना अधिक वाढली आहे.


इस्मा (ISMA) तर्फे शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळी शाळांच्या परिसरात नियमित पोलिस गस्त ठेवावी, आवश्यक असल्यास अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करावा तसेच संभाव्य धोकादायक घटकांवर कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.


संघटनेचे अध्यक्ष साईनाथ म्हात्रे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांची सुरक्षा हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. पोलिस प्रशासनाने तात्काळ योग्य उपाययोजना राबवून शाळांभोवती सुरक्षित वातावरण निर्माण करावे.” यावेळी मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे संघटनेने सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post