दिवा \ आरती परब : दिव्यातील आगासन येथे आयोजित श्री गुरुदत्त जयंती उत्सवाचा सोहळा यावर्षी १६ व्या वर्षात उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील सर्व भक्तांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात दिवसभर विविध धार्मिक उपक्रम, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ह.भ.प.श्री. बबन महाराज (सोनारपाडा) यांच्या प्रवचनाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले. तर हनुमान प्रासादिक भजन मंडळातील (बेतवडे) गायक कलाकारांच्या सुश्राव्य भजनाने रंगत वाढवली.
दुपारी गोपाळ कृष्ण भजन मंडळ (काटई) व स्थानिक कलाकारांनी भजनसेवा सादर केली. दुपारच्या सत्रात ज्ञानाई हरिपाठ मंडळ व माऊली हरिपाठ मंडळाचा (आगासन) हरिपाठ झाल्यावर ह.भ.प.श्री. विश्र्वनाथ महाराजांचे (हेदुटणे) यांच्या कीर्तनामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. तसेच संध्याकाळी माऊली गावंदेवी भजन मंडळाच्या (बेतवडे) भजन कार्यक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तर रात्री विविध गावांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोपाला रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण उत्सवाचे आयोजन श्री गुरुदेव दत्त मंडळ व ग्रामस्थ मंडळ, आगासन यांच्या वतीने करण्यात आले होते. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. त्यावेळी आस्पाल म्हात्रे, केशव बेडेकर, तानाजी म्हात्रे, चंद्राकांत बेडेकर, मच्छींद्र बेडेकर, अशोक मुंडे, भोलानाथ मुंडे, रोहिदास मुंडे, अशोक म्हात्रे, रवी म्हात्रे, स्वप्नील आंबेकर, विजय मढवी, शिवानंद म्हात्रे या सर्वांनी आजचा कार्यक्रम पार पडण्यास खुप मेहनत घेतली होती.


