मुरबाड : गुन्हे तपासातील वेग आणि अचूकता वाढवण्यासाठी मुरबाड पोलिसांच्या ताफ्यात आज अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा समावेश झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांच्या हस्ते या व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
नवीन फॉरेन्सिक व्हॅनमध्ये डिजिटल गुन्हेगारी तपासासाठी आवश्यक उपकरणे बसवण्यात आली आहेत. मोबाईल फोन व इतर डिजिटल साधनांचे विश्लेषण, डेटा रिकव्हरी, कॉल डिटेल्स, लोकेशन विश्लेषण यांसारखी तंत्रसज्जता या व्हॅनमध्ये उपलब्ध आहे. सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये तातडीने पुरावा गोळा करण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
उद्घाटनावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांनी सांगितले की, आधुनिक पोलिसिंगमध्ये तंत्रज्ञानाधारित तपास ही काळाची गरज बनली आहे. फॉरेन्सिक व्हॅनमुळे तपास प्रक्रिया अधिक परिणामकारक होईल आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल तांत्रिक साधनांचा आणखी प्रभावी वापर करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
