ठाण्यात १३ उमेदवारांचे अर्ज दाखल
दिवा \ आरती परब : ठाणे महानगरपालिकेच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. आतापर्यंत ठाण्यात एकूण १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, दिवा शहरातून मात्र एका उमेदवाराने दोन वेगवेगळे अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
निवडणूक जाहीर होताच प्रत्येक पक्षात एबी फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुकांची चढाओढ सुरू झाली आहे. अनेक जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांनी स्वतःबरोबरच कुटुंबातील सदस्यांचे पत्नी, मुलगी, सून आदींचे अर्जही दाखल केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा कमालीची वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर दिव्यातून सलग तीन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे प्रसिद्ध माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी एकाच वेळी दोन वेगवेगळे अर्ज दाखल केल्याची बाब समोर आली आहे. त्यांनी प्रभाग समितीत शिवसेनेकडून एक अर्ज, तर दुसरा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे. नव्या, दमदार उमेदवारांच्या वाढत्या उपस्थितीमुळे आपल्याला अधिकृत उमेदवारी मिळेल की नाही, या धास्तीपोटी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एकाच उमेदवाराकडून दोन अर्ज दाखल झाल्याची माहिती समजताच सर्वच पक्षातील नेते तसेच नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून, दिवा शहरात याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.
