विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडा



प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांचे पाहणीदरम्यान आवाहन 


भीमा-कोरेगाव : भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभ येथे दरवर्षी १ जानेवारी रोजी होणाऱ्या शौर्यदिन अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी प्रत्यक्ष परिसराची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन केले.


डॉ. कांबळे यांनी जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, बार्टी संस्था तसेच संबंधित विविध यंत्रणांशी सविस्तर चर्चा करून नियोजनाचा आढावा घेतला. शौर्यदिनाच्या व्यवस्थेसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यासंदर्भातील शासन निर्णय त्याच दिवशी निर्गमित करण्यात आला आहे.



समाज कल्याण विभागाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या प्रधान सचिवांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून शौर्यदिनाच्या नियोजनाची पाहणी केल्याने ही बाब विशेष मानली जात आहे. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व सेवाभावी संस्थांशी संवाद साधताना डॉ. कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले स्वातंत्र्य, समता व बंधुतेचे मूल्य जपत विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत पार पाडणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.


प्रशासन, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी परस्पर समन्वय साधून हा ऐतिहासिक सोहळा शांततेत, सन्मानाने व सुरक्षिततेने पार पाडावा, असे आवाहन त्यांनी केले.





Post a Comment

Previous Post Next Post