भिवंडी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तांच्या निर्देशानुसार बेकायदेशीर शस्त्रास्त्र व अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाई सुरू आहे. या कारवाईत भिवंडी गुन्हे शाखा युनिट–२ ला मोठे यश मिळाले आहे.
२४ डिसेंबर रोजी गायत्री नगर परिसरात गांजा विक्रीसाठी एक तरुण येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन भोईर, उपनिरीक्षक रवींद्र बी. पाटील व त्यांच्या पथकाने न्यू आझाद नगर येथील फैज-ए-आम हायस्कूलजवळ सापळा रचला.
साक्षीदारांच्या उपस्थितीत आरिफ अब्रार अहमद सिद्दीकी (वय १९) याला अटक करण्यात आली. झडतीदरम्यान त्याच्याकडून १ किलो ९०४ ग्रॅम गांजा, एक माऊसर पिस्तूल, एक जिवंत काडतूस असा एकूण १ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक रामचंद्र जाधव करत आहेत. ठाणे पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंग जाधव व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे तपास–१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
