डिजीटल होर्डींग, सोशल मीडिया व सेल्फी बूथमार्फत उपक्रम
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (२०२५–२६) येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, नागरिकांचा मतदानातील सहभाग वाढावा, यासाठी महानगरपालिकेने व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरभर विविध आधुनिक माध्यमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे.
डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता, महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) आणि व्हॉट्सॲप चॅनेल्सवर आकर्षक ग्राफिक्स व रील्सद्वारे नागरिकांना सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान करून आपला हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
याशिवाय शहरातील प्रमुख चौक, रस्ते व सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या डिजिटल होर्डिंग्स व बॅनर्सवर मतदानाविषयी संदेश व ग्राफिक्स सातत्याने प्रदर्शित केले जात आहेत. यामुळे नागरिकांना येता-जाता मतदानाचा संदेश दृष्टीक्षेपात येऊन जनजागृतीला चालना मिळत आहे.
मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेच्या मुख्यालयासह विभागीय कार्यालये, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये, तसेच मॉल्स, डी-मार्ट, नाट्यगृहे, वंडर्स पार्क, ज्वेल ऑफ नवी मुंबई, सेंट्रल पार्क, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि वाशी–नेरूळ–ऐरोली येथील रुग्णालये अशा गर्दीच्या ठिकाणी सेल्फी बूथ उभारण्यात आले आहेत.
या सेल्फी बूथवर नागरिक ‘मी मतदान करणार’ असा संदेश असलेली आपली प्रतिमा काढून ती फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स व व्हॉट्सॲप स्टेटसवर शेअर करू शकतात. यामुळे इतर नागरिकांनाही मतदानासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, मतदान हा आपल्या संविधानाने दिलेला मौल्यवान अधिकार असून तो प्रत्येकाने अभिमानाने बजावावा. तसेच या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन सोशल माध्यमांच्या माध्यमातून इतर मतदारांनाही मतदानासाठी प्रेरित करावे.


