लिडकॉम आणि लिडकारमध्ये सामंजस्य करार
मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकलेचा अमूल्य वारसा असलेल्या कोल्हापुरी चपलांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. इटली–भारत व्यापारी परिषदेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
शतकांपूर्वीपासून चालत आलेल्या पारंपरिक चप्पलनिर्मिती तंत्राला प्राडाच्या आधुनिक आणि समकालीन डिझाइनची जोड देऊन विशेष कलेक्शन विकसित केले जात आहे. हे खास कलेक्शन फेब्रुवारी २०२६ पासून प्राडाच्या जगभरातील ४० स्टोअर्समध्ये आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे ठोस पाठबळ लाभले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सक्रिय मार्गदर्शन केले. प्रधान सचिव तथा लिडकॉमचे अध्यक्ष डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांच्या धोरणात्मक प्रयत्नांमुळे हा करार शक्य झाला.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, “हा करार भारतीय कारागीर, व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी मोठा लाभदायी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कलेला नवी दिशा मिळेल. लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले, “ही भागीदारी पारंपरिक कला जपणाऱ्या पिढ्यांचा सन्मान करणारी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांच्या कौशल्याला जागतिक ओळख मिळणार आहे.”
लिडकारच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. के. एम. वसुंधरा म्हणाल्या, “कोल्हापुरी चपलांची परंपरा म्हणजे शतकांचा वारसा. या सहकार्यामुळे प्रशिक्षण, रोजगार आणि जागतिक संधींचा मार्ग मोकळा होणार आहे. प्राडा समूहाच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे प्रमुख लोरेंझो बर्टेली म्हणाले, “ही भागीदारी म्हणजे सांस्कृतिक आदानप्रदानाची नवीन दिशा. भारतीय कारागिरांच्या अतुलनीय कलेला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
करारामध्ये ‘प्राडा मेड इन इंडिया – इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल्स’ या विशेष प्रकल्पाचा आराखडा, अंमलबजावणी पद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील पारंपरिक कारागिरांच्या सहकार्याने या चपला भारतातच बनवल्या जाणार असून प्राडाच्या समकालीन डिझाईन्स, प्रीमियम मटेरिअल आणि पारंपरिक कौशल्याचा संगम या कलेक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे.
कोल्हापुरी चपला महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि कर्नाटकातील बेळगावी, बागलकोट, धारवाड, बिजापूर या आठ जिल्ह्यांमध्ये तयार केल्या जातात. २०१९ मध्ये मिळालेल्या जिओग्राफिकल इंडिकेशन (GI) टॅगमुळे या चपलांची अस्सलता आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक दृढ झाले आहे.

