भाजप ठाणे जिल्हा सरचिटणीसपदी सतीश केळशीकर


दिवा \ आरती परब : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, ठाणे शहर (जिल्हा) यांच्या वतीने शशिकांत (सतीश) मनोहर केळशीकर यांची ठाणे जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ठाणे शहर विधानसभा आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भाजप प्रदेश सरचिटणीस डॉ. माधवी नाईक-मेंढे तसेच भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.


या प्रसंगी अनुसूचित जाती मोर्चा, ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष विरसिंह पारछा यांनी विशेष मार्गदर्शन करत, सतीश केळशीकर आपल्या कार्यकाळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून संघटना अधिक बळकट करण्यासाठी निश्चितच मोलाचे योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला.


नवनियुक्त सरचिटणीस सतीश केळशीकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पक्षाला योग्य दिशेने पुढे नेण्याचे काम आपण प्रामाणिकपणे करू. वरिष्ठ नेते व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली विकासकामे पुढे सुरू ठेवून संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल. भारतीय जनता पार्टीत कोणतेही गट नसून सर्वांना सोबत घेऊन काम करणारा हा पक्ष आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post