दिवा \ आरती परब : दिवा शहरातील ठाकरे गटाला धक्का देत त्या पक्षाच्या दोन ज्येष्ठ विभागप्रमुखांनी आज शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. माजी उपमहापौर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात उपशहर प्रमुख, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख गुरुनाथ नाईक, श्रीधर बेडेकर यांच्यासह माधुरी नाईक, सचिन भुवड आणि विकी नाईक यांनी शिंदे गटाचा धनुष्यबाण हाती घेतला. या प्रवेशामुळे दिवा शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ शिवसैनिक गुरुनाथ नाईक यांचे त्यांच्या स्वगृही मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दिवा शहरात सन १९८४ साली शिवसेना उभी राहत असताना केवळ पाच कार्यकर्ते सक्रिय होते, त्यापैकी एक म्हणून गुरुनाथ नाईक यांचे नाव घेतले जाते. पक्ष वाढीसाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून, माजी महापौर रमाकांत मढवी यांच्या निवडणुकीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाला दिवा शहरात बळकटी मिळणार असून, येत्या काळात राजकीय हालचाली अधिक तीव्र होतील, असे चित्र सध्या दिसून येत आहे.

