दुकानांचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही
डोंबिवली/ शंकर जाधव):
डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील लक्ष्मी सागर इमारतीचा बाहेरील भाग अचानक कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत इमारतीखाली असलेल्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
इमारतीचा भाग कोसळताच परिसरात एकच घबराट पसरली होती. नागरिकांनी तातडीने सुरक्षित अंतर राखले. घटनेची माहिती मिळताच महापालिका व संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी सुरू केली आहे.
इमारतीची संरचनात्मक स्थिती, तसेच कोसळण्यामागील कारणांचा तपास प्रशासनाकडून करण्यात येत असून, पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.
