भाजपच्या वतीने दिवा शहरात परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन
दिवा \ आरती परब : दिवा शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘प्रगती की दुर्लक्ष? दिवा मागतोय हिशोब!’ या घोषवाक्यांतर्गत काढण्यात आलेल्या या रॅलीच्या माध्यमातून दिवेकरांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात आली.
भाजपच्या “तुमच्या दारापर्यंत विकास” या संकल्पनेतून दिवा शहरातील गंभीर आणि प्रलंबित समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. या परिक्रमेत दिव्यातील भीषण पाणी टंचाई, आरोग्य सुविधांचा अभाव, रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे होणारे अपघात, तसेच मार्केट व बस स्टॉप नसल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय हे प्रमुख मुद्दे मांडण्यात आले. या सर्व समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आले.
या परिक्रमेचे नेतृत्व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर (जिल्हा) चे उपाध्यक्ष विजय अनंत भोईर यांनी केले. त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टी शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, दिवा शहराचे माजी नगरसेवक अशोक पाटील, विनोद भगत, सीमा भगत, गणेश भगत, महिला मोर्चा अध्यक्ष सपना भगत, कार्यकारिणी सदस्य रोशन भगत, उपाध्यक्ष नितिन कोरगावकर उपस्थित होते. तसेच अवधराज राजभर, क्रांती सिंग, नीलम मिश्रा, शिंपी तिवारी व उत्तर भारतीय महिला मोर्चा अध्यक्ष सुनीता प्रजापती यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी बोलताना विजय अनंत भोईर यांनी सांगितले की, कोणत्याही शासकीय पदावर नसतानाही त्यांनी जनहितासाठी दिवा विभागात ११ वर्षांपासून पोलीस चौकीसाठी विनामोबदला जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे गेल्या २५ वर्षांपासून पोस्ट ऑफिसही नागरिकांच्या सेवेत विनामोबदला कार्यरत आहे. आगामी काळातही दिवा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
