दिवा \ आरती परब : दिव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा राजकीय धक्का बसला असून, पक्षाचे उपशहराध्यक्ष मोतीराम शालीक दळवी यांनी पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांच्या मुलीला एबी फॉर्म न दिल्याने ते नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे.
दळवी हे स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत उपशहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मात्र महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या मुलीला उमेदवारीसाठी अधिकृत एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी हा कठोर निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
या संदर्भातील राजीनामा पत्र त्यांनी आजच्या तारखेपासून मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे सादर केला आहे. पत्रात त्यांनी उपशहराध्यक्ष पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वेच्छेने देत असल्याचे नमूद केले आहे.
दिवा शहरातील मनसेच्या संघटनामध्ये दळवी यांचे सक्रिय योगदान होते. त्यांच्या अचानक झालेल्या राजीनाम्यामुळे दिव्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. दळवी यांचा पुढील राजकीय प्रवास कोणत्या दिशेने जाईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
