मुंबई–अहमदाबाद महामार्गावर लाल झेंड्यांचा जनसागर

 


जल–जंगल–जमीन हक्कांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पालघर :  मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी जनतेचा प्रचंड जनसागर उसळला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली चारोटी ते पालघर काढण्यात आलेल्या पायी लाँग मार्चमध्ये अंदाजे १५ ते २० हजार आंदोलक सहभागी झाले. लाल झेंड्यांनी संपूर्ण परिसर व्यापत चारोटी–पालघर मार्ग जनआंदोलनाच्या लाटेत बुडाला.

कॉ. डॉ. अशोक ढवळे, कॉ. मरियम ढवळे, कॉ. डॉ. अजित नवले, आमदार कॉ. विनोद निकोले, जिल्हा सेक्रेटरी कॉ. किरण गहला, कॉ. चंद्रकांत गोरखना यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत दुपारी चारोटी येथून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चामुळे काही काळ गुजरात–मुंबई दिशेची वाहतूक नियंत्रित करण्यात आली होती.

पालघर जिल्ह्याच्या इतिहासातील हा एक मोठ्या प्रमाणावर झालेला पायी मोर्चा ठरला. मोर्चाची रांग दोन ते तीन किलोमीटरपर्यंत पसरली होती. पालघर, तलासरी, डहाणू, विक्रमगड, मोखाडा, जव्हार, वाडा तसेच ठाणे जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वनजमिनी, वरकस जमिनी, गायरान व सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर न करण्याची सरकारी भूमिका, धरणे भरलेली असतानाही पाणीटंचाई, मनरेगा योजनेतील कपात, स्मार्ट मीटरच्या नावाखाली वीज दरवाढ, वीज खाजगीकरण, नव्या श्रम संहितांमुळे कामगारांवर होणारे परिणाम तसेच रेशन, शिक्षण व आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

या मोर्चामधून जल, जंगल व जमीन हक्कांची हमी, रोजगार हमी योजनेत किमान ६०० रुपये रोज मजुरी व २०० दिवस काम, जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षक पदे तातडीने भरणे, दरमहा ३५ किलो स्वस्त धान्य, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, वाढवण व मुरबे बंदर प्रकल्प रद्द करणे, जलजीवन मिशनअंतर्गत नियमित पाणीपुरवठा आणि महावितरणचे स्मार्ट मीटर रद्द करण्याच्या मागण्या मांडण्यात आल्या.

मोर्चापूर्वी झालेल्या सभेत नेत्यांनी “मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा दिला. मंगळवारी हा मोर्चा थेट पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असून, आज सायंकाळी मनोर परिसरात मुक्काम करण्यात येणार आहे.

मोर्चादरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आपत्कालीन सेवांचीही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली होती.
हक्क आमचा — दान नको!” या घोषणांनी परिसर दणाणून गेला.




Post a Comment

Previous Post Next Post