मलंगगड : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार किसन कथोरे यांनी श्री मलंगगडावर फ्युनिक्युलर रेल्वे सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी आपण पाहिलेले हे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले, असे त्यांनी नमूद केले. अनेक प्रशासकीय अडचणी, तांत्रिक आव्हाने आणि दीर्घ प्रक्रियेतून मार्ग काढत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
या फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे आणि कल्याण पूर्व मतदारसंघाच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पार पडले. सुमारे १२०० मीटर लांबीचा हा देशातील सर्वांत मोठा फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्प असून तो बीओटी (बिल्ड–ऑपरेट–ट्रान्सफर) तत्वावर उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण आणि पथदर्शी उपक्रमांपैकी एक मानला जात आहे.
मलंगगड परिसर इको-सेंसिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयासह विविध शासकीय विभागांकडून परवानग्या मिळवणे अत्यंत गुंतागुंतीचे होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे आवश्यक मंजुरी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली, असे कथोरे यांनी सांगितले.
मंजुरीनंतर प्रत्यक्ष काम करताना मलंगगडाची दुर्गम व खडतर भौगोलिक रचना मोठे आव्हान ठरली. तरीही अभियंते, कामगार आणि संबंधित यंत्रणांच्या सामूहिक प्रयत्नातून हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी अशा लोकहिताच्या आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांना सातत्याने पाठबळ दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या फ्युनिक्युलर रेल्वेमुळे मलंगगडावरील स्थानिक रहिवासी, भाविक आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अवघ्या चार ते पाच मिनिटांत गडावर पोहोचता येणार असल्याने मुंबई-ठाणे परिसरातून पर्यटकांची संख्या वाढेल आणि त्यामुळे या परिसराच्या सामाजिक व आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास आमदार कथोरे यांनी व्यक्त केला.


