महापौरपदाची माळ भाजप की शिंदेंच्या शिवसेनेच्या गळ्यात?


ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अज्ञातवासात

डोंबिवली / शंकर जाधव : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीनंतर महापौरपद कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणूक निकालानंतर भाजपला ५० तर शिंदे गटाच्या शिवसेनेला ५३ जागा मिळाल्या असल्या, तरी स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेली ६२ ही जादुई संख्या दोन्ही पक्षांना स्वतंत्रपणे गाठता आलेली नाही. त्यामुळे महापौरपदासाठीची चुरस अधिक तीव्र झाली आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालेल्या ११ जागांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या गटाचे नगरसेवक सध्या अज्ञातवासात असल्याची चर्चा असून, ते कोणाला पाठिंबा देणार की तटस्थ राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू आहेत. त्यामुळे महापौरपदाच्या गणितात ठाकरेंच्या शिवसेनेचे पारडे जड ठरत असल्याचे चित्र आहे.

कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. आरती मोकल, अनिता दळवी, शाहू सावंत, प्रधान, रमेश जाधव, कल्याणी पाटील, वैजयंती गुजर-घोलप, वनिता राणे, राजेंद्र देवळेकर (सर्व शिवसेना) तसेच हरिश्चंद्र पाटील (भाजप) यांनी यापूर्वी महापौरपद भूषवले आहे.

२०२० पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी होती. अखेर २०२६ मध्ये निवडणुका पार पडल्या आणि महायुतीने स्पष्ट आघाडी घेतली. मात्र, भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये महापौरपद किती वर्षांसाठी आणि नेमके कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबतची बोलणी अद्याप गुलदस्त्यात आहेत. युतीतूनच महापौर होणार, इतके जरी स्पष्ट असले तरी कालावधी व नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.

दुसरीकडे, ठाकरे गटाची शिवसेना ११, मनसे ५, काँग्रेस २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १ अशा संख्याबळामुळे महापौरपदाच्या समीकरणात निर्णायक ठरू शकतात. काँग्रेस व राष्ट्रवादीची भूमिकाही महापौर निवडीनंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपकडून दीपेश म्हात्रे, राहुल दामले आणि शशिकांत कांबळे, तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून रमेश म्हात्रे, सचिन पोटे आणि निलेश शिंदे यांच्या नावांची महापौरपदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post