जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रतिपादन
कोल्हापूर \ शेखर धोंगडे : संविधानाने प्रत्येक १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला दिलेला मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा कणा असून तो अत्यंत अमूल्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. १६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने तरुण व नवमतदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी नवमतदारांना उद्देशून मतदानाचे महत्त्व, निवडणूक प्रक्रिया आणि मतदान यंत्रणेची माहिती दिली. “माझा भारत, माझे मत – मी भारत आहे” हे यंदाच्या राष्ट्रीय मतदार दिनाचे ब्रीदवाक्य असून देशातील सुमारे ९६.८ कोटी मतदारांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टीचा उपयोग इतरत्र न करता प्रत्येकाने मतदान करून लोकशाही अधिक बळकट करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा नेहमीच मतदान टक्केवारीत आघाडीवर असून ९० टक्क्यांहून अधिक मतदान करणारी अनेक केंद्रे जिल्ह्यात आहेत. तरीही सर्व मतदारांनी मतदान करण्याचा संकल्प राष्ट्रीय मतदार दिनी करावा, असे सांगत युवकांनी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनीही मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत, ब्रिटिश राजवटीनंतर मतदानाच्या माध्यमातून आपण आपले लोकप्रतिनिधी निवडत असल्याचे सांगितले. कोणत्याही आमिषाला बळी न पडता युवकांनी समाजात मतदानाविषयी जागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध शासकीय वसतिगृहे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. यामध्ये मराठा कॉलनी, साईनाथ कॉलनी येथील शासकीय वसतिगृहे तसेच श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात नवमतदारांना जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय स्तरावरील कोल्हापूरचे शाहीर आझाद नायकवडी यांनी मतदान जनजागृतीपर पोवाड्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली.
या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गीता गायकवाड, उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, तहसीलदार सुनिता नेर्लीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नवमतदार उपस्थित होते.




