दिव्यात आशेची किरणे
दिवा \ आरती परब : ठाणे महानगरपालिकेचे महापौर पद अनुसूचित जाती (SC) साठी आरक्षित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर दिवा प्रभाग समितीतील प्रभाग क्रमांक २८ मधील SC आरक्षित जागेतून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक दिपक जाधव यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दिपक जाधव हे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांचे निकटवर्तीय मानले जातात. महापालिकेतील अनुभव, संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील सक्रिय कामकाजामुळे ते पक्षातील विश्वासू चेहरा म्हणून ओळखले जातात. दिवा– शीळ विभागातून शिवसेनेचे १० तर भाजपचा १ नगरसेवक निवडून आल्याने या विभागात शिवसेना भक्कम स्थितीत असल्याचे चित्र आहे. दिव्यातील २७,२८ आणि २९ हे प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जातात.
दरम्यान, अनुभवी नगरसेवक दिपक जाधव यांची ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाल्यास दिवा परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांचा बॅकलॉग भरून निघेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व नागरी समस्यांवर प्रभावी निर्णय घेणारे नेतृत्व दिव्याला मिळावे, अशी नागरिकांची इच्छा आहे.
महापौरपदाचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाकडून होणार असला, तरी सध्याच्या घडीला दिपक जाधव यांचे नाव जोरदार चर्चेत असून, त्यांच्या संभाव्य निवडीकडे दिवा परिसराचे लक्ष लागले आहे.
