सर्व पूर्व प्राथमिक (प्री-प्रायमरी) शाळा शासनाच्या अखत्यारित


बदलापूर घटनेनंतर राज्य सरकारचा कठोर निर्णय

मुंबई : बदलापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या गंभीर घटनेनंतर राज्य शासनाने कठोर आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक (प्री-प्रायमरी) शाळा आता शासनाच्या अखत्यारित येणार असल्याची घोषणा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केली आहे. या निर्णयामुळे बालसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.


पूर्व प्राथमिक शाळांबाबत घेतलेल्या या निर्णयामुळे लहान मुलांची सुरक्षितता, शिक्षणाची गुणवत्ता तसेच शिस्तबद्ध शैक्षणिक व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या अत्यंत संवेदनशील विषयाची तातडीने दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार यांचे विविध स्तरातून मनापासून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.


या निर्णयासाठी बदलापूर उपनगराध्यक्ष प्रियांका आशिष दामले आणि संगीता ताई चेंदवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयाचा सातत्याने आणि जबाबदारीने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे बदलापूरमधील पालक व नागरिकांच्या भावना शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या असून, त्याचा सकारात्मक परिणाम या निर्णयाच्या रूपाने समोर आला आहे.


राज्य सरकारच्या या निर्णयानुसार, पूर्व प्राथमिक शाळांसाठी नोंदणी प्रक्रिया, शिक्षकांची पात्रता, शाळेतील सुविधा, वाहतूक व्यवस्था तसेच बालसुरक्षेसाठी कठोर नियम लागू करण्यात येणार आहेत. यामुळे अशा शाळांवर शासनाचे थेट नियंत्रण राहणार असून, भविष्यात अशा घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.


या संपूर्ण प्रकरणाची संवेदनशीलतेने दखल घेऊन तत्काळ निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारचेही मनापासून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. लहान मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि समाजहिताच्या दृष्टीने शासनाने घेतलेली ही भूमिका निश्चितच अत्यंत महत्त्वाची असून, बालसुरक्षेच्या दिशेने उचललेले हे पाऊल निर्णायक ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post