वंचित बहुजन आघाडीच्या उपक्रमात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
दिवा \ आरती परब : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीने दिवा शहरात, ठाणे महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या दिव्यात भव्य रॅली काढली. ब्राह्मणी- मनुवादी व्यवस्थेने शतकानुशतके स्त्री, बहुजन व वंचित समाजाला शिक्षण, सन्मान आणि मूलभूत हक्कांपासून दूर ठेवले. या अन्यायकारक व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले यांनी ज्ञान, संघर्ष आणि धैर्याच्या बळावर समाज परिवर्तनाची क्रांतिकारी मशाल पेटवली.
ही रॅली दिवा स्टेशनपासून सुरू होऊन मिलिंद नगरपर्यंत निघाली होती. या रॅलीला शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रॅलीतून सामाजिक अन्याय, वाढती महागाई, बेरोजगारी, खासगीकरण आणि लोकशाहीवरील हल्ल्यांविरोधात ठाम व निर्भीड भूमिका मांडण्यात आली.
या रॅलीत डॉ. गाथा विकास इंगळे, विकास प्रकाश इंगळे, डॉ. देवेंद्र कांबळे, रूपेश कांबळे, ठाणे शहर उपाध्यक्ष प्रमोद खांबे, दिवा विभाग प्रमुख मिलिंद गवई, समाजसेवक बालाजी कदम, विजय पवार, संभाजी कदम, रुपाली कांबळे, दिपाली वाघ, प्रभाग क्रमांक २७ व २८ चे उमेदवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. ही रॅली केवळ जयंतीचा उत्सव नव्हता, तर बहुजनांच्या हक्कांसाठी ठाणे महानगर पालिकेत राजकीय संघर्ष अधिक तीव्र करण्याचा ठोस आणि लढाऊ संकल्प व्यक्त करणारी ठरली.
