पहिल्या पेपरला झूम वेबकास्ट निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत

 


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची परीक्षा केंद्रांना भेटी

नांदेड :  इयत्ता बारावीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा पेपर आज जिल्ह्यातील ११२ परीक्षा केंद्रांवर शांततापूर्ण व सुरळीत वातावरणात पार पडला. प्रत्येक परीक्षा केंद्रावर झूम वेबकास्टद्वारे थेट निरीक्षण ठेवण्यात आल्यामुळे परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण राहिले, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

पोलीस यंत्रणेमार्फत सर्व केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणत्याही ठिकाणी अनुचित जमाव किंवा गोंधळाची घटना घडली नाही. शासनाच्या निर्देशानुसार यंदा परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून बारावीच्या पहिल्या पेपरसाठी झूम वेबकास्टद्वारे जिल्हास्तरीय थेट निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागात स्वतंत्र जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष (वॉर रूम) कार्यान्वित करण्यात आला होता. या यंत्रणेमुळे जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवरील कामकाजावर सतत नजर ठेवणे शक्य झाले आणि परीक्षा पारदर्शक व शांततापूर्ण वातावरणात पार पडली.

दरम्यान, सीसीटीव्ही निरीक्षणादरम्यान एका परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळून आला. त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी (ता. कंधार) येथील एका परीक्षार्थ्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात आली. उर्वरित सर्व केंद्रांवर परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.




जिल्हा नियंत्रण कक्षाची संकल्पना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः महात्मा फुले आश्रमशाळा, वाघाळा येथील परीक्षा केंद्रास भेट दिली. विद्यार्थ्यांची रांग योग्य पद्धतीने न लावल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. याच केंद्रास मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनीही भेट दिली.

शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी भीमाशंकर उच्च माध्यमिक विद्यालय, शिराढोण व नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी या केंद्रांना भेटी दिल्या. शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांनी विद्याविकास उच्च माध्यमिक विद्यालय, बा-हाळी व आश्रमशाळा, चव्हाणवाडी येथील केंद्रांची पाहणी केली.
रामचंद्र पाचंगे यांनी राष्ट्रमाता उच्च माध्यमिक विद्यालय, वाजेगाव, तर अवधूत गंजेवार यांनी आश्रमशाळा, मरवाळी तांडा येथील केंद्रास भेट दिली. डायटचे प्राचार्य अमोल निळेकर यांनी लाल बहादूर शास्त्री उच्च माध्यमिक विद्यालय, संगुचीवाडी येथे, तर ज्येष्ठ अधिव्याख्याता मंजूषा औंढेकर यांनी जिल्हा परिषद हायस्कूल व दि ओअ‍ॅसिस स्कूल, कुंटूर येथील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.

परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात महसूल विभागाचे ८, जिल्हा परिषदेचे १२ आणि शिक्षण विभागाचे ६ अशी एकूण २६ विशेष पथके कार्यरत होती. याशिवाय उपविभाग स्तरावर ८ उपविभागीय अधिकारी, तालुका स्तरावर १६ तहसीलदार, १६ गटविकास अधिकारी, १६ नायब तहसीलदार व १६ कृषी विकास अधिकारी यांची भरारी पथके सक्रिय होती. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण १०१ भरारी पथकांनी पहिल्या दिवशी प्रभावी कामकाज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी प्रदीप दुमणे तर जिल्हा परिषद स्तरावर सुनील आलूरकर, पोकले यांच्यासह अन्य अधिकारी सतत लक्ष ठेवून होते. आजच्या इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरसाठी एकूण ४२,८०३ परीक्षार्थ्यांपैकी ४१,७२३ परीक्षार्थी उपस्थित होते. उपस्थितीचे प्रमाण ९७.४८ टक्के असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.




Post a Comment

Previous Post Next Post