मुंबईत आयुष मंत्रालयाकडून ‘युनानी दिन’ साजरा


युनानी प्रॅक्टिसमधील नवोपक्रम आणि पुरावे’ या विषयावर राष्ट्रीय परिषद

मुंबई : आयुष मंत्रालयतर्फे १४–१५ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे “युनानी प्रॅक्टिसमधील नवोपक्रम आणि पुरावे” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून जागतिक युनानी दिन २०२६ साजरा करण्यात आला. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिषदेत धोरणकर्ते, संशोधक, प्राध्यापक आणि उद्योग प्रतिनिधी हायब्रिड पद्धतीने सहभागी झाले.

या परिषदेला आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब मोहनराव पाटील आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा हे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुश्री मोनालिसा दास, सल्लागार (युनानी) डॉ. एम. ए. कासमी, नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन (एनआययूएम), बेंगळुरूचे संचालक डॉ. सय्यद शाह आलम तसेच डॉ. एन. ज़हीर अहमद उपस्थित होते.

दरवर्षी ११ फेब्रुवारी रोजी हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त ‘युनानी दिन’ साजरा केला जातो. हा दिवस युनानी वैद्यकशास्त्राची समृद्ध परंपरा आणि आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करतो. यंदाच्या परिषदेत वैज्ञानिक आधार अधिक मजबूत करणे, निदान व उपचारात नवोपक्रम वाढवणेचांगली क्लिनिकल नोंद ठेवणे, पारंपरिक ज्ञान आधुनिक वैद्यकासोबत जोडणे या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. वाढत्या जीवनशैलीजन्य व दीर्घकालीन आजारांच्या पार्श्वभूमीवर युनानी पद्धती अधिक परिणामकारक करण्यासाठी संशोधन, मानकीकरण आणि परिणामाधारित अभ्यासांची गरज अधोरेखित करण्यात आली.

परिषदेत हमदर्द लॅबोरेटरीज (इंडिया) यांच्या नेतृत्वाखाली उद्योग प्रतिनिधीमंडळाने सहभाग घेतला. चेअरमन आणि मॅनेजिंग ट्रस्टी श्री अब्दुल मजीद तसेच वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी संयुक्त संशोधन आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी हमदर्द लॅबोरेटरीज (इंडिया) आणि सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हमदर्दकडून डॉ. संतोष जोशी (आरअँडडी प्रमुख) आणि सेंट्रल कौन्सिलकडून डॉ. एन. ज़हीर अहमद उपस्थित होते.

ही परिषद चर्चा, ज्ञानविनिमय आणि संशोधन सादरीकरणासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरली. ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय दृष्टीकोनानुसार युनानी वैद्यक अधिक सक्षम, पुराव्याधारित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक करण्यावर परिषदेत विशेष भर देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post