ठाणे : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकत आघाडी घेतली आहे. महायुतीतील सहकारी पक्षांपेक्षा तसेच मविआतील घटक पक्षांपेक्षा अधिक जागा मिळवत भाजपाने राज्यातील जनतेचा कौल आपल्यालाच असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. या निकालांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण ही आजच्या राजकारणातील प्रभावी जोडी असल्याचे अधोरेखित झाले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि रविंद्र चव्हाण यांच्या नियोजनबद्ध रणनीतीच्या बळावर भाजपाने सलग तिसऱ्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यशाची हॅट्ट्रिक साधली आहे. नोव्हेंबरमधील नगर परिषद निवडणुका, जानेवारीतील महानगरपालिका निवडणुका आणि आता फेब्रुवारीतील जिल्हा परिषद निवडणुका या तिन्ही टप्प्यांमध्ये भाजपाने प्रभावी कामगिरी करत आपली संघटनात्मक ताकद सिद्ध केली आहे.
अचूक निवडणूक नियोजन, मजबूत प्रचार यंत्रणा, स्थानिक आणि राज्य पातळीवरील नेतृत्वातील समन्वय, तसेच कार्यकर्त्यांशी थेट संवाद या माध्यमांतून भाजपाने सक्षम पक्षयंत्रणा उभी केली. त्यामुळे अनेक ठिकाणी अपेक्षेच्या पलीकडे जाऊन विजय मिळवण्यात पक्षाला यश आले. या यशाचे मुख्य शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून, निवडणूक रणनितीचे सूत्रधार रविंद्र चव्हाण असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची ओळख जमिनीवर काम करणारे, कार्यकर्त्यांत रमणारे आणि प्रभावी निवडणूक व्यवस्थापक अशी आहे. विचारधारेच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि मतदारांना जोडण्याची त्यांची क्षमता तसेच दिल्ली व नागपूरमधील सत्ताकेंद्रांशी असलेला समन्वय यामुळे पक्षाला अधिक बळ मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही जोडी आगामी काळातही भाजपासाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
.jpg)
