उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे पुणे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेच्या सभागृहात आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी विविध पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. मंजुषाताई नागपुरे यांनी महापौरपद स्वीकारल्यानंतर शहर विकास, नागरी सुविधा, स्वच्छता, वाहतूक व नागरिकाभिमुख प्रशासनावर भर देण्याचा संकल्प व्यक्त केला.
उपमहापौर परशुराम वाडेकर यांनीही सामाजिक समतेसह सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नव्या नेतृत्वाखाली पुणे शहर विकासाची नवी उंची गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या कार्यकाळासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
