विक्रम चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण गोंडोली येथील विद्यामंदिरमध्ये झाले, तर पुढील शिक्षण कोकरूड येथील यशवंत महाविद्यालयात पूर्ण झाले. देशसेवेची जिद्द मनात बाळगून त्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश केला. अहिल्यानगर येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१८ मध्ये राजस्थानमधील सुरतगड येथे त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे त्यांची बदली झाली होती. सध्या ते उरी येथे ८ राष्ट्रीय रायफल्स (आरआर) दलात कार्यरत होते.
शहीद जवानाचे पार्थिव मूळ गावी गोंडोली येथे दाखल होताच ‘वीर जवान विक्रम चव्हाण अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कोल्हापूरपासून गोंडोलीपर्यंतच्या मार्गावर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. पार्थिव काही काळ त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यानंतर वारणा नदीच्या तीरावर लष्कर आणि पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून अंतिम सलामी दिली आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार सीमा सोनवणे, सभापती प्रियांका भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सैन्यदलाचे अधिकारी, माजी सैनिक आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.
विक्रम चव्हाण यांच्या निधनाने चव्हाण कुटुंबाचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, मोठा भाऊ, तीन विवाहित बहिणी, पत्नी आणि अवघ्या तीन वर्षांची मुलगी वीरा असा परिवार आहे. अंत्यसंस्कारावेळी पत्नी आणि चिमुकली मुलगी वीराच्या आक्रोशाने उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले.

