जिल्हा परिषद निवडणुकीत कुडाळ तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व

 


 शिवसेना ५, भाजप २, उबाठा १, अपक्ष १

कुडाळ :  कुडाळ तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गटांचे निकाल जाहीर झाले असून, शिवसेना (शिंदे गट) ने ५ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाला २ जागा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला १ जागा तर अपक्ष उमेदवाराला १ जागा मिळाली आहे. काही गटांमध्ये शेवटपर्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाल्याने मतमोजणीदरम्यान मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

घावनळे गटातून केशव उर्फ दीपक नारकर (शिंदे शिवसेना), माणगावमधून रुपेश कानडे (शिंदे शिवसेना), पावशीमधून तुकाराम उर्फ दादा साईल (शिंदे शिवसेना), आंब्रडमधून दीपलक्ष्मी पडते (शिंदे शिवसेना) आणि वेताळ-बांबर्डेमधून नागेश आईर (शिंदे शिवसेना) विजयी झाले आहेत. भाजपकडून तेंडोलीमधून आरती पाटील आणि ओरोसमधून सुप्रिया वालावलकर यांनी विजय मिळवला आहे. पिंगुळीमधून गंगाराम सडवेलकर (उबाठा) तर नेरूर देऊळवाडामधून रुपेश पावसकर (अपक्ष) विजयी झाले आहेत.

काही ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. पावशी गटात केवळ २२ मतांच्या फरकाने तुकाराम साईल विजयी झाले, तर माणगावमध्ये ४१० मतांनी, पिंगुळीत ६५६ मतांनी आणि घावनळेत ९८४ मतांनी निकाल लागला. ओरोस आणि आंब्रड गटांमध्ये मात्र मोठ्या मताधिक्याने विजय नोंदवण्यात आला.

एकूण निकालानुसार कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद गटांवर शिवसेना (शिंदे) यांची आघाडी दिसून आली असून, भाजपनेही महत्त्वाच्या दोन जागा मिळवत आपली उपस्थिती कायम राखली आहे. उबाठा गट आणि अपक्ष उमेदवारांनीही प्रत्येकी एक जागा मिळवत स्थानिक राजकारणात आपला प्रभाव दाखवून दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post