संगमनेरमध्ये वाळू माफिया व अवैध दारू वाहतुकीवर कारवाई

 


५ आरोपी अटकेत, २६.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर :  अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) संगमनेर उपविभागात वाळू माफिया व अवैध दारू वाहतूकदारांविरोधात मोठी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असून सुमारे २६ लाख ४५ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने ७ फेब्रुवारी रोजी संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. डिग्रस गावाच्या शिवारात दोन डंपरमधून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकून प्रकाश कोरडकर (रा. हजारवाडी) व फिरोज शेख (रा. डिग्रस) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन डंपर व चार ब्रास वाळू असा सुमारे २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पिंपरणे गावातील ‘हॉटेल गरीब’ येथे छापा टाकून साहेबराव राहिंज याच्याकडून ४४,२४० रुपये किमतीची देशी-विदेशी दारू५ लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली. देवगाव परिसरात निलेश मुंतोडे व अमोल मुंतोडे यांना देशी दारू वाहतूक करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून दारू व मोटारसायकल असा ६१,५२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


या सर्व कारवायांमध्ये एकूण ४ ब्रास वाळू, दोन डंपर, देशी-विदेशी दारू, कार व मोटारसायकल असा २६.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे यशस्वी केली.




Post a Comment

Previous Post Next Post