कल्याण-डोंबिवलीत ‘डिप क्लीनिंग’ विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

 



कल्याण :  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ‘डिप क्लीनिंग’ विशेष स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ मंगळवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुर्गाडी किल्ला येथे महापौर हर्षाली चौधरी (थविल) व उपमहापौर राहुल दामले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दुर्गा देवीचे दर्शन घेऊन शहर स्वच्छतेसाठी संकल्प करण्यात आला.

ही विशेष मोहीम ९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान दररोज सर्व प्रभाग क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन)  रामदास कोकरे यांनी प्रस्तावनेत स्वच्छता मोहिमेचे महत्त्व स्पष्ट करत नागरिकांच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.



आयुक्त अभिनव गोयल यांनी शहर शाश्वत व स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच मानांकन उंचावण्यासाठी नगरसेवक व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. उपमहापौर राहुल दामले यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून शहर स्वच्छतेत सातत्य राखावे, असे सांगितले. महापौर हर्षाली चौधरी (थविल) यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना संपूर्ण शहर व ग्रामीण भागातही सर्वंकष स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त  हर्षल गायकवाड, नगरसेवक अस्मिता मोरे, विजया पोटे, शालिनी वायले,  रेखा चौधरी, समिना शेख,  गणेश जाधव,  गणेश लांडगे, उमेश बोरगांवकर, मोरेश्वर भोईर,  जयवंत भोईर, रमेश जाधव,  कांचन कुलकर्णी, जतिन प्रजापती तसेच सहायक आयुक्त (घकव्य.) आगस्तिन घुटे, मुख्य स्वच्छता अधिकारी, स्वच्छता अधिकारी, निरीक्षक व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post