वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनद्वारे राष्ट्रीय एकता, कोस्टल सुरक्षेचा सशक्त संदेश

 


जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले विशेष कौतुक

पालघर :  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन” या राष्ट्रीय उपक्रमाने पालघर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. राष्ट्रीय एकता, शारीरिक तंदुरुस्ती आणि कोस्टल सुरक्षेबाबत जनजागृती या त्रिसूत्री उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी विशेष कौतुक केले.

दमन येथून सकाळी ५ वाजता रवाना झालेल्या या सायक्लोथॉनचे सकाळी सुमारे ९ वाजता डहाणू येथे आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते सायक्लोथॉनचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, डहाणू नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंकिता कणसे, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, पोलीस निरीक्षक किरण पवार, CISF चे वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड म्हणाल्या, “हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी असून, CISF ने अवघ्या २५ दिवसांत ६,५०० किलोमीटरहून अधिक अंतर सायकलिंगद्वारे पार करण्याचा संकल्प केला आहे. ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षपूर्तीचे औचित्य साधत राष्ट्रीयत्वाची भावना, कोस्टल सुरक्षेची जबाबदारी आणि फिटनेसचा संदेश एकत्रितपणे देण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.”




दमन येथून सुरू झालेला हा सायक्लोथॉन पालघर जिल्ह्यात मुक्काम करून कोस्टल मार्गाने मुंबईकडे रवाना होणार आहे. या मोहिमेत विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, पालघर जिल्ह्यातील काही नागरिक व पोलीस दलाचे कर्मचारीही या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे या उपक्रमाला व्यापक व सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

शाळांतील सुट्टीच्या कालावधीत विशेष जनजागृती सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यातून विद्यार्थ्यांना देशसेवा, राष्ट्रीय सुरक्षा आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत अधिक माहिती मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी CISF च्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन करत, “तुम्ही देशसेवेचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहात. पालघर जिल्ह्यात आगमन केल्याबद्दल आणि या राष्ट्रीय मोहिमेत आम्हाला सहभागी करून घेतल्याबद्दल पालघर प्रशासनातर्फे मनापासून आभार,” अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.




Post a Comment

Previous Post Next Post