हत्तीरोग दुरीकरणासाठी भिवंडी तालुक्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहीम

 


१० ते २३ फेब्रुवारीदरम्यान मोबाईल आरोग्य जनजागृती

ठाणे :  हत्तीरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील सहा जिल्ह्यांतील १६ तालुक्यांमध्ये १० ते २३ फेब्रुवारी या कालावधीत सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए) राबविण्यात येणार असून, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात या मोहिमेचा शुभारंभ मोबाईल आरोग्य जनजागृती व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते करण्यात आला.

ही मोहीम जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, ठाणे व Godrej Embed – FHI संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती शिंदे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. बालाजी गावडे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी संजय जाधव व जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे उपस्थित होते.


या मोहिमेंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देऊन डीईसी व अल्बेंडाझोल औषधांची मात्रा देणार आहेत. भिवंडी तालुक्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने येथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, एकूण ७ लाख १२ हजार ४९ पात्र लाभार्थ्यांना औषधे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये स्थलांतरित कामगारांचीही मोठ्या प्रमाणात नोंद असून वीटभट्ट्या, गोदामे, बांधकाम प्रकल्प व कारखान्यांतील कामगारांचा समावेश आहे.

हत्तीरोग हा संक्रमित डासांच्या चाव्यामुळे पसरणारा गंभीर आजार असून तो दीर्घकालीन अपंगत्व निर्माण करू शकतो. या आजारावर कायमस्वरूपी उपचार नसल्याने प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी औषधे घेऊन मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोषी शिंदे यांनी केले आहे.

मोहिमेसाठी ५३१ पथके तयार करण्यात आली असून, दोन वर्षांखालील मुले, गर्भवती महिला व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना औषधे देण्यात येणार नाहीत. औषधे उपाशीपोटी न घेता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सेवन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही औषधे आतड्यातील जंतुसंसर्ग व त्वचारोगांवरही प्रभावी ठरून मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाला सहाय्यभूत ठरणार आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post