अंबरनाथ-बदलापूर वृत्तपत्र विक्रेता संघाची नगराध्यक्षांकडे मागणी
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रश्नांबाबत अंबरनाथ-बदलापूर वृत्तपत्र विक्रेता संघाने येथे निवेदन सादर केले. या वेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून त्यांच्या मागण्या आणि अडचणी समजून घेण्यात आल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील वृत्तपत्र विक्रेते प्रामाणिकपणे नागरिकांच्या दारी वेळेवर वृत्तपत्र पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. पहाटेपासून कार्यरत राहून शहरातील वाचनसंस्कृती जपण्यामध्ये त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे, याची प्रशासनाला पूर्ण जाणीव असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नगराध्यक्षा सीए तेजश्री विश्वजीत करंजुळे- पाटील यांनी स्पष्ट केले की, वृत्तपत्र विक्रेत्यांवर कोणत्याही प्रकारची अनावश्यक अथवा अन्यायकारक कारवाई होऊ देण्यात येणार नाही. नगरपरिषद प्रशासनामार्फत योग्य ती दक्षता घेतली जाईल. शासनाच्या नियमांनुसार व मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कायदेशीर स्टॉलसाठी योग्य जागा निश्चित करून आवश्यक परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
शहरातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन, नियमांचे पालन करत सर्वांना न्याय मिळेल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी नमूद केले.यावेळी विक्रेत्यांनी व्यवसाय टिकवण्यासाठी स्थिर जागा उपलब्ध करून द्यावी, वारंवार होणारी कारवाई थांबवावी व प्रशासनाने सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
#catejashreevkaranjule #meeting #ambernath


