परीक्षा नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थेबाबत व्यक्त केले समाधान
नांदेड : इयत्ता बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी मंगळवारी धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद या परीक्षा केंद्राला भेट देऊन व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिकांची सुरक्षित साठवणूक व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणेचे कार्यान्वयन, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, परीक्षा हॉलमधील शिस्त तसेच पर्यवेक्षकांची उपस्थिती यांची प्रत्यक्ष पाहणी केली. परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाश व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी तपासले. केंद्रप्रमुख व शिक्षकांनी जबाबदारीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने परीक्षा व्यवस्थापन केल्याबद्दल जिल्हाधिकारी कर्डिले यांनी त्यांचे कौतुक केले.
जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांनी याच पद्धतीने काटेकोरपणे नियमांचे पालन करून परीक्षा पार पाडाव्यात, तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला बळी न पडता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


