बीएस्सी–एमएस्सी विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ऐतिहासिक करार




प्राध्यापकांचा एआय टेक्नॉलॉजीवर भर 

विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

नाशिक : आयटी क्षेत्रात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, औद्योगिक आणि संशोधनात्मक बळकटीकरण करत त्यांचे भविष्य अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने मविप्र कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत (नाशिक) आणि २०१५ पासून आयटी क्षेत्रात कार्यरत सुमागो इन्फोटेक प्रा. लि. यांच्यात पाच वर्षांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

मविप्र समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, प्राचार्य प्रा. (डॉ.) सुरेश व्ही. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख प्रा. मनीषा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली हा करार विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी नवी दिशा देणारा ठरणार आहे. विशेषतः कॅम्पस रिक्रूटमेंटच्या संधींवर यामध्ये विशेष भर देण्यात आला आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने या सामंजस्य करारामध्ये बीएस्सी व एमएस्सी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना थेट उद्योगसंबंधित अनुभव मिळावा यासाठी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये इंटर्नशिप आणि लाईव्ह प्रोजेक्ट्स, औद्योगिक प्रशिक्षण,गेस्ट लेक्चर्स व करिअर गाईडन्स, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, हॅकाथॉन व कोडिंग स्पर्धा, इंडस्ट्रियल व्हिजिट्स, जॉइंट सेमिनार, वर्कशॉप्स आणि वेबिनार, प्रोजेक्ट मेंटॉरशिप तसेच प्राध्यापकांनी एआयसारख्या आधुनिक तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवावे यासाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स (FDPs) आयोजित करण्यात येणार आहेत. पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी MSBTE अभ्यासक्रमानुसार विशेष प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध होणार आहे.


या करारावर सुमागो इन्फोटेकच्या CEO व को-फाउंडर सोनाली अधाव गोराडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) सुरेश व्ही. जाधव यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी प्रा. चैताली मेधने व वृषाली वर्पे उपस्थित होत्या.


उद्योग उभारणीकडे झेप

या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना एआय व आयटी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, प्रॅक्टिकल कौशल्ये, रिअल-टाइम प्रोजेक्ट्स आणि प्रोफेशनल मेंटॉरशिप मिळणार आहे. त्यामुळे प्लेसमेंटसोबतच उद्योजकता आणि उच्च शिक्षणासाठीही मजबूत पाया तयार होणार आहे. या ऐतिहासिक करारामुळे पिंपळगाव बसवंत येथील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, कॉम्प्युटर सायन्स विभागात जणू आनंदोत्सव साजरा होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post