१८ व १९ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक, शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रम; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मार्गदर्शन
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जळगाव जिल्ह्यात १८ व १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे दोन दिवसीय जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांचा समावेश असणार आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रभात फेरी, किल्ले बनविण्याची स्पर्धा, रांगोळी व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, पराक्रम, विचार व कार्य यांची ओळख करून देण्यात येणार आहे. तसेच छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे महाराजांचा संपूर्ण जीवनपट उलगडणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व नाट्यप्रयोग सादर होणार असून, नामवंत कलाकारांच्या सहभागातून उपस्थितांना प्रेरणादायी अनुभव मिळणार आहे.
किल्ले स्पर्धेसाठी आवश्यक माती, बॅरिकेडिंग व मार्किंगची व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. चित्रकला स्पर्धेसाठी कागद प्रशासन देणार असून, सजावटीचे साहित्य व रंग स्पर्धकांनी स्वतः आणावेत, असे कळविण्यात आले आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा जिल्हास्तरावर सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. विद्यार्थ्यांची नावनोंदणी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणार असून, यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

