पुण्यात ‘सूर्योथॉन’मध्ये २४ तासांत २४२४ सूर्यनमस्कार


महिलांचा दमदार विक्रम

पुणे : शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक एकाग्रता आणि अदम्य इच्छाशक्तीचा संदेश देणाऱ्या ‘सूर्योथॉन’ या २४ तास अखंड सूर्यनमस्कार साधना उपक्रमात यंदा महिलांनी ऐतिहासिक कामगिरी करत प्रेरणादायी विक्रम नोंदविला. ८ व ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यात एसपी’स योगा स्टुडिओतर्फे आयोजित या उपक्रमात राजश्री जाधव-पाटील, स्वप्ना आहेरवाडीकर आणि डॉ. मंगल कुलकर्णी यांनी सलग २४ तासांत प्रत्येकी २४२४ सूर्यनमस्कार पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी बजावली.


कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या राजश्री जाधव-पाटील यांच्यासह पुण्यातील स्वप्ना आहेरवाडीकर आणि डॉ. मंगल कुलकर्णी यांनी अत्यंत चिकाटी, शिस्त आणि सातत्य दाखवत हा टप्पा गाठला. या उपक्रमाचे संकल्पक व आयोजक सचिन पारुंडेकर यांनी सांगितले की, सूर्योथॉनचे हे सलग १४ वे वर्ष असून दरवर्षी साधकांचा उत्साह आणि सहभाग लक्षणीय वाढत आहे.


शनिवारी सूर्यास्तापासून सुरू झालेली ही साधना रविवारी सूर्यास्तापर्यंत अखंड सुरू होती. यंदा या उपक्रमात १३५ हून अधिक साधकांनी सहभाग घेत एकत्रितपणे ७५ हजारांहून अधिक सूर्यनमस्कार पूर्ण केले. शारीरिक क्षमता, मानसिक स्थैर्य आणि आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याची प्रतिक्रिया आयोजकांनी व्यक्त केली.


या कामगिरीबाबत बोलताना राजश्री जाधव-पाटील म्हणाल्या, सूर्योथॉनमध्ये सहभागी होण्याचे हे माझे दुसरे वर्ष होते. मागील वर्षी मी २४०० सूर्यनमस्कार पूर्ण करणारी एकमेव महिला होते. यावर्षी आम्ही तिघींनी मिळून २४२४ सूर्यनमस्कारांचे शिवधनुष्य पेलले. सूर्यनमस्कारातील सातत्य आणि त्यातून वाढलेली सहनशक्ती यामुळेच हा विक्रम शक्य झाला.


त्या पुढे म्हणाल्या, यंदा मी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी जाणार आहे. सूर्योथॉनमुळे स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची खरी चाचपणी करता आली. महिलांनी निरोगी राहण्यासाठी सूर्यनमस्कारासारखा सर्वांगीण व्यायाम नियमित करणे अत्यंत आवश्यक आहे.


या विक्रमामुळे महिलांच्या फिटनेस, सहनशीलता आणि सातत्यपूर्ण साधनेच्या क्षमतेचा प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचला असून विविध स्तरांतून सहभागींचे कौतुक होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post