परीक्षा सुरू असताना विविध शाळांना अचानक भेट
बीड : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व सुरळीत वातावरणात पार पडत आहे का, याची खात्री करण्यासाठी ही तपासणी करण्यात आली.
भेटीदरम्यान परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही व्यवस्था कार्यरत आहे का, केंद्रप्रमुख व पर्यवेक्षक वेळेवर उपस्थित आहेत का, परीक्षार्थींना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व बसण्याची योग्य व्यवस्था उपलब्ध आहे का, याची सखोल तपासणी करण्यात आली. तसेच प्रश्नपत्रिका वाटप व उत्तरपत्रिका संकलनाच्या संपूर्ण प्रक्रियेवरही काटेकोर निरीक्षण ठेवण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुख व शिक्षकांशी संवाद साधत परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त, शिस्तबद्ध व विश्वासार्ह वातावरणात पार पाडण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क असून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी परीक्षा कालावधीतही अशाच प्रकारच्या अचानक तपासणी मोहिमा सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून, त्यामुळे परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा व पालकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


