लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा


जळगाव महानगरपालिकेत वेळेच्या शिस्तीवर महापौरांचा बडगा

जळगाव :  नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत जळगाव महानगरपालिकाच्या महापौर दिपमाला मनोज काळे यांनी आज सकाळी महापालिका मुख्यालयात अचानक भेट देत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची तपासणी केली. सकाळी सुमारे ९:५० वाजता घेतलेल्या या पाहणीत काही अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित नसल्याचे उघड झाल्याने महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


कार्यालयीन वेळेचे पालन न करता कर्मचारी आपल्या सोयीनुसार हजर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापौर काळे यांनी ही बाब गंभीर असल्याचे नमूद करत प्रशासनातील शिस्त अबाधित ठेवण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या करातून वेतन घेत असल्याने त्यांच्याप्रती जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



महापौरांनी उद्यापासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी ९:४५ वाजेपर्यंत कार्यालयात अनिवार्यपणे उपस्थित राहण्याचे आदेश दिले असून, सकाळी १० नंतर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. तसेच, वेळेवर हजेरी लावून संबंधित विभागात तत्काळ कामकाज सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.


यावेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. हजेरीसंदर्भात कडक नियम लागू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ अधिकृत आदेश काढण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. महापालिका ही जनसेवेची संस्था असून नागरिकांना वेळेत व दर्जेदार सेवा देणे हेच प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे महापौरांनी यावेळी अधोरेखित केले.




Post a Comment

Previous Post Next Post