शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मंजूर


अंबरनाथ नगरपरिषदेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेचा आर्थिक वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प बहुमताने मंजूर झाला असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस दिशा देणारा रोडमॅप असल्याचे नगराध्यक्षा सीए तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील यांनी स्पष्ट केले.

या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पाणीपुरवठा यंत्रणेचे आधुनिकीकरण, गळती रोखण्यासाठी विशेष तरतूद तसेच सार्वजनिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण यावर भर देण्यात आला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा वाढवण्याचाही विशेष विचार करण्यात आला आहे.

शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, पथदिव्यांची संख्या व गुणवत्ता वाढवणे आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी स्वतंत्र निधी राखीव ठेवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

तसेच नगरपरिषदेची आर्थिक शिस्त मजबूत करण्यासाठी कर वसुली सुधारणा, थकीत देयकांची प्रभावी वसुली आणि विविध शासकीय योजनांमधून जास्तीत जास्त निधी आणण्याचा ठाम निर्धार असल्याचे नगराध्यक्षा यांनी सांगितले.

“हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा ताळेबंद नसून अंबरनाथच्या उज्ज्वल भविष्यासाठीची दिशा आहे. नागरिकांच्या सहकार्याने विकासकामांना निश्चितच गती देऊ,” असे आवाहन त्यांनी केले.




#catejashreevkaranjule #Budget2026 #Arthsankalp2026 #AmbernathBudget2026

Post a Comment

Previous Post Next Post