ठाण्यातील वाहतूककोंडीवर लवकरच ठोस उपाय

 


प्रायोगिक बदलांना हिरवा कंदील

ठाणे : शहराची वाढती लोकसंख्या व वाहनसंख्या लक्षात घेता घोडबंदर रोड, स्टेशन परिसर, वर्तकनगर आणि मध्यवर्ती ठाणे भागातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिका, वाहतूक शाखा, आरटीओ आणि नागरिक प्रतिनिधी यांच्या समन्वयातून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या अनुषंगाने आवश्यक वाहतूक बदलांसाठी लवकरच प्रायोगिक तत्त्वावर अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

तीन हात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत अवजड वाहने, खासगी बस, मीटर व शेअर रिक्षांची अनधिकृत वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग तसेच फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी शहरात सुमारे २ हजार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, मनुष्यबळ अपुरे ठरल्यास पुढील अधिवेशनात शासनाकडे अतिरिक्त मनुष्यबळासाठी मागणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. बैठकीस वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ, आरटीओ अधिकारी गोसावी, नौपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीमती भोईर व ढोले, माजी उपमहापौर ॲड. सुभाष काळे, नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील, अमित सरय्या, सुनेश जोशी, उषा वाघ, व्यापारी प्रतिनिधी मितेश शहा, जितेंद्र मढवी, हिरानंदानी परिसरातील प्रतिनिधी डे यांच्यासह अनेक नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रायोगिक बदलांच्या काळात स्टेशन परिसरात वाहतूक व आरटीओ अधिकारी संयुक्तपणे उपस्थित राहणार असून नागरिक व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षित, सुकर आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.




Post a Comment

Previous Post Next Post