हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषदेत भाजप आघाडीवर; पंचायत समितीत वर्चस्व


हातकणंगले / शेखर धोंगडे : हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून जिल्हा परिषदेत भाजप ४, काँग्रेस ३, शिवसेना (शिंदे गट) ३ तर जनसुराज्य शक्ती पक्ष १ जागेवर विजयी झाला आहे. पंचायत समितीत भाजपने २२ पैकी ११ जागा जिंकत सर्वाधिक वर्चस्व सिद्ध केले आहे.

इचलकरंजी येथील राजीव गांधी सभागृहात सकाळी १० वाजता २२ टेबलांवर मतमोजणी सुरू झाली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंतिम निकाल घोषित करण्यात आला. जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपने शिरोली, कोरोची, कबनूर आणि पट्टणकोडोली या चार जागांवर विजय मिळवला. कोरोची मतदारसंघात आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक चुरशीची ठरली, तर पट्टणकोडोलीत उमेदवाराच्या जातीच्या दाखल्यावरून वाद झाला होता.

काँग्रेसने घुणकी, भादोले आणि रुई या तीन जागा पटकावल्या. शिवसेना (शिंदे गट) आळते, रुकडी आणि रेंदाळ या तीन जागांवर विजयी झाली, तर जनसुराज्य शक्ती पक्षाने कुंभोज मतदारसंघात यश मिळवले.

पंचायत समितीमध्ये भाजपने ११, शिवसेना (शिंदे गट) ५, जनसुराज्य शक्ती पक्ष ३, काँग्रेस २ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) १ जागा जिंकली. भाजप–शिंदे सेना–जनसुराज्य आघाडीला मिळालेल्या १९ जागांमुळे पंचायत समितीवर त्यांची स्पष्ट सत्ता प्रस्थापित झाली आहे.

पंचायत समितीचे सभापती पद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असल्याने पट्टणकोडोली मतदारसंघातून निवडून आलेल्या अश्विनी अनिल बिरांजे यांना सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे आणि सहाय्यक निर्णय अधिकारी सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पार पडली. मतमोजणी केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.




Post a Comment

Previous Post Next Post