आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत GPES शाळेची दमदार कामगिरी


दिवा \ आरती परब : Abbott India आणि Smile Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने कांदिवली, मुंबई येथील Padma Vibhushan Atal Bihari Vajpayee Sabhagruh येथे भव्य आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई येथील सुमारे १४ शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


विविध संघ खेळ तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्पर्धेला रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या कौशल्य, शिस्त आणि क्रीडाभावनेचे उत्कृष्ट दर्शन या स्पर्धेत घडले.


दिवा पूर्व, ठाणे येथील GPES शाळेने या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी ३ सुवर्णपदके, १ रौप्यपदक आणि तब्बल १३ कांस्यपदके पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली. तसेच मुलांच्या कबड्डी स्पर्धेत GPES शाळेने तृतीय क्रमांक मिळवत संघभावना आणि चिकाटीचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले.


शाळा व्यवस्थापनाच्या वतीने गुंजन मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष पाल यांनी ॲबॉट इंडिया आणि स्माईल फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्निहित व दडलेल्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी इतका सुंदर व प्रेरणादायी मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. तसेच क्रीडा प्रशिक्षक, शिक्षकवर्ग आणि पालकवर्ग यांच्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे ही स्पर्धा यशस्वी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

Post a Comment

Previous Post Next Post