नगरसेविका दिपाली उमेश भगत यांचा वचनपूर्ती दौरा


नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य

दिवा \ आरती परब : ‘काम करत आलोय... काम करत राहू’ या शिवसेनेच्या ब्रीदवाक्याची प्रचिती देत दिवा पूर्वेतील बी.आर. नगर परिसरात नगरसेविका दिपाली उमेश भगत यांनी वचनपूर्ती दौरा केला. यावेळी शिवसेना दिवा पूर्व विभागप्रमुख उमेश अशोक भगत, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने बिल्डिंग तसेच चाळींमध्ये प्रत्यक्ष भेटी देत नागरिकांशी संवाद साधण्यात आला. परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, गटार लाईनची समस्या, पथदिव्यांची अपुरी व्यवस्था तसेच मुबलक पाणीपुरवठा या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


नागरिकांनी मांडलेल्या अडचणी समजून घेत तातडीने संबंधित विभागांशी पाठपुरावा करून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन नगरसेविका दिपाली भगत यांनी दिले. “परिसरातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या दौऱ्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल, अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post