कल्याण \ शंकर जाधव : अमेरिका–इस्रायल–इराण यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटताना दिसत आहेत. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी सिग्नलजवळ असलेल्या गुरुकृपा भारत गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या भीतीने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एजन्सीकडे धाव घेतली. परिणामी, एजन्सीच्या बाहेर तब्बल पाचशे मीटरपर्यंत ग्राहकांच्या रांगा लागल्या असून परिसरात गर्दीचे चित्र दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये भविष्यात गॅस पुरवठा कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक जण अतिरिक्त सिलेंडर घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे अचानक मागणी वाढल्याने वितरण व्यवस्थेवर ताण आला आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना घाबरून जाऊन अनावश्यक साठा न करण्याचे आवाहन केले आहे. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
