अर्थसंकल्पात दिवा शहरासाठी भरीव तरतूद नाही



पालिका सभागृहात दिव्यांसाठी नगरसेवक ॲड. आदेश भगत यांचे  प्रशासनाला खडे बोल

दिवा \ आरती परब  : ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभेत दिवा शहराच्या प्रश्नांवर जोरदार आवाज उठल्याचे चित्र पाहायला मिळाले. नगरसेवक ॲड. आदेश भगत यांनी अर्थसंकल्पात दिवा शहरासाठी भरीव तरतूद नसल्याचा आरोप करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.


महापालिकेच्या स्थापनेपासून दिवा विभागाचा समावेश असतानाही सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून नगरविकास खात्याकडून निधी मिळाल्यामुळेच दिव्यात काही विकासकामे झाली, अन्यथा शहराची अवस्था बिकट झाली असती, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना शहरप्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या पाठपुराव्यामुळेच अनेक कामे मार्गी लागल्याचे त्यांनी नमूद केले.


२०२६-२७ च्या अर्थसंकल्पात आधुनिक प्रकल्पांचा समावेश असला तरी त्यामध्ये दिवा शहराचा ठळक उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. दिव्यात पोलिस ठाणे, रुग्णालय, रेशनिंग कार्यालय, तलाठी कार्यालय, अग्निशामक केंद्र, पोस्ट ऑफिस यांसारख्या मूलभूत सुविधा शहराबाहेर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.


मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :


रेतीबंदर ते दिवा गाव कोस्टल रस्ता उभारणे व पुढे बुलेट स्टेशनपर्यंत विस्तार


दिवा स्टेशनजवळील तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक उभारणी


दिवा पश्चिमेतील शाळा क्रमांक ९८ व ७९ यांचा मॉडेल स्कूलमध्ये समावेश व दहावीपर्यंत विस्तार, CBSE शाळा सुरू करणे


दिवा-आगसन व दिवा-शीळ रस्त्यांवर वृक्षलागवड


दिवा पश्चिमेतील स्मशानभूमीची पुनर्बांधणी व आवश्यक सुविधा


शहरातील सर्व रस्त्यांची दररोज स्वच्छता; ‘डीप क्लिनिंग’ऐवजी ‘कीप क्लिनिंग’ धोरण राबवणे



दिवा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या मागण्यांचा अर्थसंकल्पात समावेश करावा, अशी ठाम भूमिका नगरसेवक ॲड. आदेश भगत यांनी सभागृहात मांडली.

Post a Comment

Previous Post Next Post