जळगाव : “माझे जळगाव, स्वच्छ जळगाव” या संकल्पनेतून शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात महापालिकेतर्फे भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या स्वच्छतेच्या प्रश्नाची दखल घेत महापौर Deepmala Kale (दिपमाला काळे) यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली आणि मोहिमेला वेग दिला. नागरिक व व्यापाऱ्यांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींनंतर प्रशासनाने ही धडक कारवाई हाती घेतली.
या विशेष मोहिमेत ४५३ बीव्हीजी कामगार, ५ ट्रॅक्टर, ३ पिकअप आणि १ डंपर यांच्या सहाय्याने तब्बल २२ टन कचरा गोलाणी मार्केट परिसरातून उचलण्यात आला. स्वच्छतेदरम्यान काही विक्रेते खराब फळे, गवत, कागदी कचरा व इतर टाकाऊ साहित्य रस्त्यावर टाकताना आढळल्याने त्यांना जागेवरच कचरा उचलून कचराकुंडीत टाकण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या.
याचवेळी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर थेट कारवाई करत पिशव्या जप्त करण्यात आल्या. येत्या दोन दिवसांतही प्लास्टिकचा वापर सुरू राहिल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक दुकानदार, व्यापारी आणि नागरिकाचे कर्तव्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रत्येक दुकानाबाहेर कचराकुंडी ठेवणे, ग्राहकांना कचरा न टाकण्याबाबत जागरूक करणे तसेच प्लास्टिकऐवजी कापडी किंवा पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
या मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वच्छता अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी जळगावासाठी अशी मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


