जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रतिपादन
सिंधुदुर्गनगरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली असून लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत झाली आहे. समाजपरिवर्तनासाठी महापुरुषांनी दिलेल्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या आदराने डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण केले. कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, प्रतिभा पोवार, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, स्त्री सक्षमीकरणाच्या क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. महिलांना शिक्षण, वारसाहक्क तसेच सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. अलीकडेच महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती साजरी करण्यात आली. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी दिशा मिळाली असून संपूर्ण देशालाही व्यापक आणि समतावादी दृष्टिकोन प्राप्त झाला आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात समानता आणि न्यायाची भक्कम पायाभरणी झाली आहे.
“माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे, हीच दोन्ही महामानवांच्या कार्याची प्रमुख समानता आहे,” असे नमूद करत त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा समाजाला मिळाल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण करण्याचे मोठे कार्य या दोन्ही महान नेत्यांनी केले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी या दोन्ही महामानवांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय असून, शिक्षणाची दारे खुली करून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. महिलांना समान संधी देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले.
दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेले हे दोन्ही तेजस्वी महामानव देशासाठी प्रेरणास्थान असून, त्यांच्या विचारांनी आणि कार्याने पवित्र झालेल्या या भूमीत जन्म घेणे हे आपले भाग्य असल्याची भावना जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली. यावेळी उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांनी समता गीत सादर केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनप्रवासावर विलास आरोंदेकर, विठ्ठल मालनकर आणि निलेश वेरुळकर यांनी आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला.


