कोल्हापूर / शेखर घोंगडे : पासपोर्ट अपॉइंटमेंट लवकर उपलब्ध करून देणे आणि पासपोर्ट सेवेमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) पुणे यांच्या वतीने पिंपरी येथील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रात (POPSK) दि. २० ते ३० एप्रिल या कालावधीत विशेष ‘पासपोर्ट मोबाईल व्हॅन’ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना जलद अपॉइंटमेंट मिळण्यास मदत होणार असून पासपोर्ट प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी प्रौढ आणि अल्पवयीन अशा दोन्ही अर्जदारांनी संबंधित चेकलिस्ट काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्जदाराची सत्यता तपासण्यासाठी पारपत्र कायदा १९६७ चा कलम ५ तसेच पारपत्र नियम १९८० चा नियम ५ नुसार, पारपत्र प्राधिकरण आवश्यक वाटल्यास अतिरिक्त माहिती व कागदपत्रे मागवू शकते.
मोबाईल व्हॅनसाठी अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी पासपोर्ट इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सामान्य योजनेअंतर्गत अर्ज सादर करावा. ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर ‘अपॉइंटमेंट निश्चित करा’ या पर्यायावर जाऊन ‘मोबाईल व्हॅन’ हे स्थान निवडून अपॉइंटमेंट निश्चित करावी.
ही सेवा दि. २० ते ३० एप्रिलदरम्यान पिंपरी पोस्ट ऑफिस, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स समोर, जुना पुणे-मुंबई महामार्ग, खराळवाडी, पुणे – ४११०१८ येथे सकाळी ८:३० ते सायंकाळी ६ या वेळेत उपलब्ध राहणार आहे. अर्जदारांनी त्यांच्या ऑनलाइन अर्ज पावतीवर नमूद केलेल्या वेळेच्या किमान १५ मिनिटे अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
