कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील अपघातात ११ जणांचा मृत्यू

 



इको टॅक्सी आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांच्या धडकेत  २ गंभीर जखमी

शंकर जाधव / कल्याण :  कल्याण परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. इको टॅक्सी आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेले सर्वजण मुरबाड येथील रहिवासी असून ते कल्याणहून मुरबाडकडे प्रवास करत होते. संबंधित पुलावर सध्या एकमार्गी वाहतूक सुरू असल्याने वाहनांची गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर हा भीषण अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. पूल पूर्णपणे सुरक्षित नसतानाही घाईघाईत वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त इको टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे जीवितहानी अधिक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी पोलिस आणि बचाव पथकांनी तात्काळ धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post