शेखर धोंगडे \ कोल्हापूर : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) मंडळ कार्यालय, कोल्हापूर अंतर्गत “मेगा रिटेल क्रेडिट आऊटरीच कार्यक्रम” यशस्वीपणे पार पडला. या अभियानाचा मुख्य उद्देश संभाव्य ग्राहकांपर्यंत बँकिंग सेवा अधिक व्यापकपणे पोहोचवणे आणि व्यावसायिक बांधिलकी अधिक बळकट करणे हा होता.
हा कार्यक्रम एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आला. कोल्हापूर येथील जेम्स स्टोन शाखा कार्यालयात मंडळ प्रमुख राजीव कुमार राय (उप महाव्यवस्थापक), उप मंडळ प्रमुख मुकुल मंगलेश (सहाय्यक महाव्यवस्थापक) तसेच मुख्य व्यवस्थापक सुनील जी उपस्थित होते. पणजी, गोवा येथे आयोजित कार्यक्रमास प्रधान कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे परमेंद्र सिंह असवाल (उप महाव्यवस्थापक), पीएलपी प्रमुख जगत पात्रा (सहाय्यक महाव्यवस्थापक) आणि सीएसी प्रमुख रवि जिंदल (सहाय्यक महाव्यवस्थापक) यांची उपस्थिती लाभली. याशिवाय जुले सोलापूर शाखेत झालेल्या कार्यक्रमास उप मंडळ प्रमुख दिनेश पांडेय (सहाय्यक महाव्यवस्थापक) आणि शाखा प्रमुख सतीश गोरंटी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विविध ठिकाणी संभाव्य ग्राहकांशी व्यापक संपर्क साधण्यात आला. या उपक्रमातून सुमारे ६३ कोटी रुपयांहून अधिक कर्जरकमेचे १५३ क्रेडिट लीड्स प्राप्त झाले असून, त्यांचे लवकरच वितरण करून बँकेच्या व्यावसायिक उद्दिष्टांना गती देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, हा उपक्रम बँकेचे एमडी व सीईओ अशोक चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक-केंद्रित सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. बँक सातत्याने कर्ज योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच अधिकाधिक नागरिकांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्व पात्र लीड्सचा निश्चित कालमर्यादेत जलद निपटारा करून ग्राहक समाधानाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.


